जिल्हा परिषद सीईओ मंदार पत्की यांच्याकडून ‘सीखें’च्या शैक्षणिक कार्याची दखल

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
जिल्ह्यात यशवंतराज पंचायत अभियानांतर्गत शाळा भेटीवर असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘सीखें’ संस्थेच्या कार्याची दखल कौतुक केले.
शाळेत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची, शासकीय योजना, शाळा इमारत बांधकाम आदींची पाहणी करण्याकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की हे सध्या जिल्हा दौरा करत आहेत. या अनुषंगाने त्यांनी मंगळवारी बाभूळगाव व नेर तालुक्यातील पिंपळखुटा, वेणी, सावर, माणिकवाडा, पाथ्रट गोळे आदी शाळांना भेट देवून पाहणी केली. या शाळांमध्ये ‘सीखें’ संस्थेच्या वतीने ‘टीआयपी’ उमक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये वर्गखोलीत मूड चार्ट, वाचन कोपरा, दिनदर्शिका, अक्षरपट्ट्या आदी घटक लावले आहेत. काही शाळांमध्ये भेटीदरम्यान सीईओ मंदार पत्की यांनी ‘सीखें’च्या अध्यापन पद्धतीतील घटकांची माहिती जाणून घेतली.
नेर तालुक्यातील माणिकवाडा येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या भेटीदरम्यान त्यांनी ‘सीखें’ संस्थेच्या प्रतिनिधींशी संवाद साधून संस्थेचे काम जाणून घेतले. नेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे यांनी नेर तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू असलेल्या ‘सीखें’ संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी सकारात्मक प्रतिसाद देत सीईओ पत्की यांनी, ‘सीखेंचे काम शाळांमध्ये सुरू असल्याची मला पूर्ण कल्पना आहे. विशेषतः कळंब तालुक्यात त्यांचे मोठे काम आहे. मी त्यांच्या यशोगाथा सोशल मीडियावर बघत असतो. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे’, असे गौरवोद्गार काढले.
यावेळी सीखेंचे सहजिल्हा व्यवस्थापक नितीन पखाले यांनी संस्थेच्या उपक्रमांबद्दल त्यांना अधिक माहिती दिली. कळंबसह बाभूळगाव, नेर आणि यवतमाळ तालुक्यातील शाळांमध्ये ‘टीआयपी’ उपक्रमांतर्गत भाषा आणि गणित विषयांवर काम सुरू असल्याचे सांगून शिक्षकांना वर्षातून दोनदा प्रशिक्षण दिले जाते, तसेच विद्यार्थ्यांना कार्यपुस्तिका उपलब्ध करून दिल्या जातात, असे सांगितले. उपक्रमातील विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाबद्दलही त्यांनी जाणून घेतले. तेव्हा विद्यार्थी आता विविध दृष्टिकोनातून विचार करू लागले आहेत. भाषा विषयात मुले स्वतःच्या शब्दांत गोष्टी लिहू व सांगू लागली आहेत. तर, गणित विषयातील संकल्पना उदाहरणांच्या माध्यमातून दृश्य स्वरूपात मांडण्यावर त्यांचा भर वाढला आहे, अशी माहिती संस्थेच्या प्रतिनिधींनी त्यांना दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यावर अधिक भर दिला जावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी युवराज म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे आदी उपस्थित होते.


