वडिलांनीच मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप हेलियम सिलिंडर देऊन मार्गदर्शन केल्याचा दावा; पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह

यवतमाळ (कॉटन सिटी न्यूज प्रतिनिधी)
वडिलांनीच आपल्या मुलीला मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा धक्कादायक आरोप वर्धा येथील एका डॉक्टर महिलेने केला आहे. इतकेच नव्हे, तर हेलियम गॅसद्वारे आत्महत्या करता येते, असे सांगून सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले आणि त्याचा वापर कसा करायचा, याचा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे.
डॉ. सुषमा अरुण वानखेडे (रा. ड्रिमझलँड सिटी, सावंगी मेघे, वर्धा) यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी नक्षत्रा अरुण वानखेडे हिने 6 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री आत्महत्या केली. या घटनेला पती डॉ. अरुण वानखेडे, नणंद प्रमिला गजानन विणकरे आणि रेवती देवतळे हे जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
डॉ. सुषमा वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार, पतीचे एका महिलेशी कथित अनैतिक संबंध होते. या प्रकाराला त्यांनी व मुलीने विरोध केला होता. त्यानंतर दोघींनाही सातत्याने शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. “तू आमच्या कुटुंबासाठी कलंक आहेस, तू मरून जा,” अशा शब्दांत मुलीला टोमणे मारले जात असल्याचा आरोप आहे.
त्यांचा दावा आहे की, पतीनेच मुलीला हेलियम गॅसने आत्महत्या करता येते, असे सांगितले. त्यासाठी सिलिंडर आणून दिला आणि तो कसा वापरायचा, याचा व्हिडिओही पाठवला. सततच्या मानसिक छळामुळे आणि नैराश्यामुळे मुलीने टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप डॉ. सुषमा यांनी केला आहे.
▪️ पोलिसांच्या भूमिकेवर संशय
या प्रकरणी 16 डिसेंबर 2025 रोजी सावंगी (मेघे) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, गुन्हा दखलपात्र असूनही अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेली नसल्याचा आरोप डॉ. सुषमा यांनी केला आहे. राजकीय दबावामुळे पोलिस कारवाई टाळत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
▪️ न्यायासाठी संघर्ष
डॉ. सुषमा वानखेडे यांनी पोलिस अधीक्षक, मुख्यमंत्री कार्यालय आणि महिला व बालविकास विभागाकडे लेखी तक्रारी दिल्या आहेत. त्यांच्याकडे ऑडिओ, व्हिडिओ व चॅट स्वरूपात ठोस पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दोषींवर कडक कारवाई करून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.



