गणतंत्र दिनी डॉक्टरानी वृद्धाश्रमात वृद्धांशी केली चर्चा वडिलांचे स्वप्न साकार करणारा सेवायज्ञ : यवतमाळात ‘स्व. श्री सत्यनारायण अमोलचंद भूत वृद्धाश्रम’

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज प्रतिनिधी
समाजातील वृद्ध, निराधार आणि एकाकी व्यक्तींना सन्मानाने जगता यावे, या उदात्त हेतूने यवतमाळ–चौसाळा रोड परिसरात ‘स्वर्गीय श्री सत्यनारायण अमोलचंद भूत वृद्धाश्रम’ कार्यरत आहे. श्री मनीराम बाबा मानव सेवा संस्था यांच्या माध्यमातून चालवला जाणारा हा वृद्धाश्रम सेवाभाव, आत्मीयता आणि स्वबळावर उभा राहिलेला आदर्श उपक्रम ठरत आहे.
निसर्गरम्य वातावरणात सुमारे पाच एकर क्षेत्रफळावर उभारलेल्या या वृद्धाश्रमात सध्या १२ वृद्ध व १३ महिला-पुरुष सुरक्षित व सन्मानजनक निवास करत आहेत. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र वैद्यकीय व निवास व्यवस्था, अद्ययावत भोजन कक्ष, भोजन तयार करण्यासाठी स्वतंत्र सुसज्ज स्वयंपाकगृह तसेच व्हीलचेअर सुविधेसह वैद्यकीय सेवा येथे उपलब्ध आहे.
या वृद्धाश्रमाचे संचालक श्री हरिओमजी भूत व सौ. मंजू देवी भूत यांनी कोणतीही देणगी न स्वीकारता, पूर्णतः स्वबळावर हा सेवायज्ञ साकारला आहे. “वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच हा उपक्रम हाती घेतला,” असे भावनिक मनोगत हरिओमजी भूत यांनी व्यक्त केले. भविष्यात या परिसरात अनाथ आश्रम उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.
भूत कुटुंबातील दोन्ही सुपुत्र समाजसेवेत अप्रत्यक्ष हातभार लावत आहेत. निरंजन भूत एका नामांकित कंपनीत कार्यरत असून आशुतोष भूत यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला आहे. कुटुंबातील सदस्य विविध क्षेत्रांत, अगदी अमेरिकेतही कार्यरत असले तरी समाजाशी नाळ जपण्याचा हा उपक्रम विशेष ठरतो.
दरम्यान, गणतंत्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांची चमू यांनी वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. वृद्धाश्रमाची माहिती जाणून घेतल्यानंतर डॉक्टरांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी डॉ. मानसी तुपे यांच्यासह सहकाऱ्यांनी उपस्थित राहून वृद्धांना शुभेच्छा दिल्या.
निःस्वार्थ सेवा, सामाजिक बांधिलकी आणि मानवी मूल्यांचा संगम असलेला हा वृद्धाश्रम आज अनेकांसाठी आधारवड ठरत असून, समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण करत आहे.
गणतंत्र दिनानिमित्त अनेक मान्यवरांनी आज सदिच्छा भेट दिली त्यामध्ये भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ अमरावती विभागाचे अध्यक्ष विजयकुमार बुंदेला जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपक घरझोडे डॉ. मानसी तुपे डॉ. महिमा कोठारी डॉ. अदिती जैन डॉ. सईदा फातिमा अमरीनडॉ. मानसी तुपेडॉ. मोहित घाटे डॉ. रमेश्वर थोरे डॉ. उज्ज्वल इंडोरिया डॉ. आकांक्षा लाडोले डॉ. ओशन शिवरकर डॉ. पूर्वी तिमांडे डॉ. यामिनी तुमदाम डॉ. अरुण कल्याणकरआदी उपस्थित होते.



