सोशल मीडियावर महिला पदाधिकाऱ्याची बदनामी; अश्लील भाषेचा वापर केल्याचा आरोप – पोलिसांकडे तक्रार
यवतमाळ | प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष सौ. आरती सुधीर जांगळे यांनी सोशल मीडियावर त्यांच्या वैयक्तिक फोटोंचा गैरवापर करून बदनामी करण्यात येत असल्याची गंभीर तक्रार पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, रोहन रामटेके नावाचा व्यक्ती कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या वैयक्तिक फोटोंचा वापर करून खोटे, बदनामीकारक व अश्लील मजकूर प्रसारित करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे त्यांची वैयक्तिक प्रतिमा तसेच संघटनेची प्रतिष्ठा धोक्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“मी महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी 24/7 काम करते. अशा प्रकारे महिलांच्या प्रतिष्ठेवर घाला घालणे ही गंभीर बाब आहे. हा प्रकार केवळ माझ्यापुरता मर्यादित नसून, समाजातील प्रत्येक महिलेसाठी धोक्याचा इशारा आहे,” असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
यवतमाळ दौऱ्यावर असताना सहकाऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ व फोटोबाबत माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचेही त्यांनी सांगितले.
संबंधित व्यक्तीविरोधात आयटी ॲक्ट, महिला अत्याचार प्रतिबंधक कायदे व बदनामीसंबंधी कलमान्वये कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.



