विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत कलह उफाळला

यवतमाळ कॉटन सिटी प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून, “विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?” अशी अवस्था शिवसैनिकांची झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात निर्माण झालेल्या दोन गटांतील संघर्षामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे.
गरपरिषद निवडणुकीत एकही जागा निवडून न आल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक संतोष ढवळे यांनी यवतमाळ येथील उत्सव मंगल कार्यालयात शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. पक्षासाठी मोठे सहकार्य करूनही अपेक्षित यश मिळाले नाही, “भोपळाही फोडता आला नाही”, या भावनेतून हा कार्यक्रम आयोजित केल्याची चर्चा होती.
मात्र या कार्यक्रमाला तीव्र विरोध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक राजेंद्र गायकवाड तसेच जिल्हाध्यक्ष किशोर इंगळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उत्सव मंगल कार्यालय गाठले. कार्यक्रमस्थळी पोहोचताच दोन्ही गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. मंचावरील पोस्टर्स, बॅनर्स काढून टाकण्यात आल्याने परिस्थिती अधिकच चिघळली आणि तुफान राडा झाला.
या घटनेत शिवसेनेतून निष्कासित करण्यात आलेले संतोष ढवळे व त्यांचा समर्थक गटही कार्यक्रमस्थळी उपस्थित होता. दोन्ही गटांमध्ये तीव्र शब्दयुद्ध झाले असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच तातडीने पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कार्यक्रमस्थळी लावलेले अनेक पोस्टर व बॅनर्स हटवण्यात आले होते.
या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील गटबाजी अधिक ठळकपणे समोर आली आहे. आधीच दोन गटांत विभागलेल्या पक्षात समन्वयाचा अभाव, नेतृत्वावरून मतभेद आणि कार्यकर्त्यांतील नाराजी उघड झाली असून, याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



